Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register

जाहिरात

 

वृंदा सलगर यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...

schedule16 May 25 person by visibility 724 categoryकोल्हापूर

२५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम

कोल्हापूर : दिव्या कांबळे

वृंदा सलगर हे नाव म्हणजे समर्पण, दूरदृष्टी आणि महिला सक्षमीकरणाचा एक मूर्तिमंत आदर्श. इतिहास विषयात B.A. आणि HR व मार्केटिंगमध्ये MBA पूर्ण करून त्यांनी केवळ स्वतःचं करिअर घडवलं नाही, तर अनेक महिलांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली आहे. वृंदा सलगर यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. रविवार २५ मे रोजी कोल्हापुरातील शाहुस्मारक सभागृहात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानेवृंदा सलगर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

22 वर्षांचा व्यापक अनुभव असलेल्या वृंदाताईंनी पुणे, हैदराबाद आणि दुबई अशा विविध शहरांमध्ये कार्य केलं आहे. आज त्या विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात "डायरेक्टर" पदावर कार्यरत असून विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने अनेक विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत स्थान मिळवून दिलं आहे.

पण त्यांची खरी ओळख ठरते ती "स्वयम" या संस्थेमुळे. ही संस्था महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी समर्पित आहे. दोन वर्षांपूर्वी केवळ चार महिलांनी सुरू केलेली ही चळवळ आज 125 पेक्षा अधिक महिलांना स्वाभिमानाने जगण्याची दिशा देत आहे. या संस्थेची खासियत म्हणजे येथे कोणत्याही प्रकारचे भांडवल न लावता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. वृंदाताईंच्या मार्गदर्शनामुळे अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, आपल्या कुटुंबाचे आर्थिक गणित सुधारले आहे.

स्वयंपूर्णतेच्या दिशेने प्रयत्नशील असलेल्या या महिलांची 'स्वयम' संस्था म्हणजे खर्‍या अर्थाने महिला सबलीकरणाचा उजळवलेला दीप आहे, आणि वृंदा सलगर यांची भूमिका या दीपस्तंभासारखी आहे.

त्यांची ही वाटचाल हे सिद्ध करते की, योग्य दिशा, निस्सीम मेहनत आणि दृढ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. वृंदाताईंनी केवळ स्वतःच्या यशाची वाटचाल केली नाही, तर इतर महिलांसाठीही यशाचे दरवाजे उघडले. त्यांच्या कामाची दखल घेवून अनेक सामाजिक संस्था, मीडियाकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या महिला सक्षमीकरण आणि सामाजिक, उद्योग क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्या वतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes