नांदणीच्या महादेवी हत्तीनीने वनतारामध्ये पाऊल ठेवताच काय घडलं?
schedule01 Aug 25 person by visibility 98 categoryकोल्हापूर

माधुरीच्या मागच्या पायाला काहीतरी पट्टी लावल्यासारखं त्या वनताराच्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओवरती अनेकांनी कमेंट करत सवाल उपस्थित केले आहेत.
नांदणी गावातील श्री जिनसेन मठामधील 'माधुरी' हत्तीला जामनगर (गुजरात) येथील वनतारा उद्यानामध्ये हलविल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजाने मोठा संताप व्यक्त केला आहे. या विरोधात तीव्र आंदोलन छेडले असून रिलायन्स कंपनीच्या पोस्टरला जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला. तसेच उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजाने घेतला. नांदणीच्या माधुरी हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश सुरू आहे. अशातच वनताराने माधुरीचे स्वागताचे सोशल मिडीयावरती काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते, ते आता व्हायरल होत आहेत, त्यावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला असून प्रश्न उपस्थित केले आहेत. माधुरीचा वनतारामधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये माधुरीच्या पायाला काहीतरी लागल्याचे दिसते असं नेटकरी म्हणत आहेत.
माधुरीच्या पायाला काय झालं?
माधुरीच्या मागच्या पायाला काहीतरी पट्टी लावल्यासारखं त्या वनताराच्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओवरती अनेकांनी कमेंट करत तिला पहिल्याच दिवशी दुखापत झाली, तिची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही. जो व्यक्ती त्या व्हिडीओमध्ये दिसतो आहे, त्याने माधुरीला चिमटीमध्ये पकडलं आहे, अशा प्रकारच्या कमेंट आता तिच्या व्हिडीओवरती येऊ लागल्या आहेत. माधुरी वनतारामध्ये पोहोचताच तिचा हा पहिलाच फोटो समोर आला आहे आणि त्यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.