मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : सरपंचांसाठी गावांच्या विकासाची मोठी संधी
schedule07 Aug 25 person by visibility 9 categoryPolitics

मुंबई : राज्यात 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून, सरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
मंत्रालयात ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच परिषदेच्या मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, “राज्य शासन गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहे. या अभियान कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करणे, ग्रामस्वच्छता, सुंदर शाळा उभारणी, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सौर ऊर्जेचा वापर, महिला बचतगटांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिला जावा.”
तसेच, महा-ई-सेवा केंद्रांमार्फत मिळणाऱ्या सेवा व दाखल्यांवरील शुल्कातून जमा होणाऱ्या निधीपैकी 30 टक्के निधी ग्रामपंचायतींना दिला जातो, त्याचा योग्य वापर करून स्थानिक विकासकामे करावीत, असेही श्री. गोरे यांनी सांगितले.
यावेळी नवी मुंबई येथे सर्वसुविधायुक्त सरपंच भवन उभारणे, यासह विविध मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली.
बैठकीत सरपंच परिषदेचे राज्य कोअर कमिटी अध्यक्ष शत्रुघ्न धनवडे, प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जी. एम. पाटील, तसेच महिला सरपंच उपस्थित होते.