जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 समारोपीय कार्यक्रम आणि महिला मेळावा संपन्न - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule01 May 25 person by visibility 33 category

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याला पाण्याचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसली, तरीही विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यातही पाण्याचा सुयोग्य वापर व नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ते जलसंपदा विभागांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या वतीने आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 च्या समारोपीय कार्यक्रमात व महिला मेळाव्यात, दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमस्थळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रमुख वक्ते शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एम. शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, कार्यकारी अभियंते संजय पाटील, रोहित बांदिवडेकर, देवाप्पा शिंदे, स्मिता माने, अशोक पवार आणि जलसंपदा विभागातील अनेक अभियंते, उपअभियंते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपविभागीय उपअभियंते व अभियंत्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात मागील दहा वर्षांत अनेक धरणांची कामे पूर्ण झाली आहेत. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून १० टीएमसी पाणी साठविणे शक्य झाले, हे मोठे यश आहे. आता पाणी बचतीसाठी ठिबक आणि स्प्रिंक्लर सिंचनाचा अधिक वापर व्हायला हवा. याबाबत व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे.’ ते पुढे म्हणाले की, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राबवलेल्या जलसाक्षरता पंधरवड्यामुळे पाण्याचे महत्त्व आणि शेतीसाठी योग्य नियोजन यावर भर देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात पाणी बचत, ताळेबंद आणि ठिबक सिंचनासारख्या उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली. ‘जलसंपदा विभागाने आता पाण्याचे समन्यायी वाटप, पूर नियंत्रण आणि पाणी केवळ अडवणे नव्हे तर त्याचा सुयोग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात,’ असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘जिल्हा जरी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असला तरी पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि बचत अत्यंत आवश्यक आहे. एमआरडीपी प्रकल्पाअंतर्गत सर्व विभागांनी एकत्र येऊन पूर नियंत्रणासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.’ पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी मागील पंधरा दिवसांतील कामकाजाचे सादरीकरण केले, तर कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली. महिला मेळाव्यात कुलसचिव डॉ. व्ही. एम. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपअभियंता प्रशांत कांबळे यांनी केले.