महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार की नाही ?...
schedule03 May 25 person by visibility 36 categoryकोल्हापूर

लाडकी बहीण योजनेचा हप्ता एप्रिल महिन्यात आला नव्हता. मे उजाडला तरी हप्त्याची काहीच माहिती मिळत नसल्याने ही योजना बंद होणार की काय अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून महिलांना दिलासा दिला होता. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यानुसार आजपासून महिलांच्या खात्यात रक्कम येण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, निवडणुकीत महायुतीकडून लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केलं. त्याचा परिणाम महायुतीला सत्ताही मिळाली. मात्र, सरकारकडून लाडक्या बहिणींना अद्यापही 2100 रुपये देण्यात आलेले नाहीत. फक्त लवकरच देऊ, असं आश्वासन सरकारकडून देण्यात येत आहेत. तर मंत्री नरहरी झिरवळ यांनी तर असं काही आश्वासनच दिलं नव्हतं, असा दावा केला आहे. त्यामुळे महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार की नाही? असा सवाल निर्माण झाला आहे.