अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर जयंत पाटलांचा टोला...
schedule03 May 25 person by visibility 47 categoryकोल्हापूर

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. याआधी त्यांनी अनेकवेळा याबाबत जाहीर भाष्य केलंय. मुंबईत बोलत असताना त्यांनी 2 मे रोजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा अप्रत्यक्षपणे सांगितली आहे. दरम्यान, यावरच आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी माहिती दिली. ते छत्रपतीनगरमध्ये बोलत होते.ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण मुख्यमंत्री होणं पाच वर्षे शक्य नाही. पण तरीही ते मुख्यमंत्री झालेच तर आम्हाला आनंद आहे.असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलंय. अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते वेगवेगळ्या बैठका आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यामुळे एकत्रिकरणाच्या या चर्चेला चांगलेच बळ मिळाले होते. यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. रयत शिक्षण संस्थेची एक बैठक झाली होती. या बैठकीला राजकीय अर्थ देण्यात काहीही अर्थ नाही. यासह घरात एखादा कार्यक्रम झाला असेल तर तो घरगुती कार्यक्रम आहे, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढू नयेत, असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं.
अजित पवार 2 मे रोजी एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात एका वक्त्याने राज्यात मुख्यमंत्रिपदी महिला विराजमान व्हायला पाहिजे, अशी आशा व्यक्त केली होती. यावरच बोलत असताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर भाष्य केलं होतं. “राही भिडे म्हणाल्या की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय,” असं भाष्य अजित पवार यांनी केलं होतं.