पोलिस क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर पोलिस संघाचा दमदार विजय
schedule03 Dec 24 person by visibility 172 categorySports

कोल्हापूर: ५० वी प्रादेशिक पोलिस क्रीडा स्पर्धा २०२४ चा मान यावर्षी कोल्हापूर जिल्हा पोलिस दलास मिळाला असून, या स्पर्धा २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत पोलिस परेड ग्राऊंड, कोल्हापूर येथे उत्साहात पार पडत आहेत.स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळच्या सत्रात कोल्हापूर पोलिस संघ आणि पत्रकार संघ यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळवण्यात आला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात कोल्हापूर पोलिस संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत ८ धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करत कोल्हापूर पोलिस संघाने निर्धारित १० षटकांत ८० धावा फटकावल्या. संघाकडून सांगली जिल्हा व मिरज शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके, तसेच सपोनि नागेश मात्रे यांनी उल्लेखनीय फलंदाजी केली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आणि अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व गोलंदाजी केली.
पत्रकार संघाने प्रतिउत्तरात १० षटकांत ७२ धावा करत पोलिस संघाला कडवी झुंज दिली. पत्रकार संघातील लुमाकांत नलावडे यांनी शानदार फलंदाजी केली, तर गौरव डोंगरे आणि सनी घाटगे यांनी उत्तम क्षेत्ररक्षण करत उपस्थितांची मने जिंकली.
सामन्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनिल फुलारी यांनी दोन्ही संघांचे खेळाडू, पंच, धावसंख्या-लेखक आणि समालोचक यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील आणि जयश्री देसाई यांनी खेळाडूंचे कौतुक करत सामन्याचा उत्साह वाढवला.
दोन्ही संघातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि पत्रकारांनी सहभाग घेऊन मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केले. उपस्थित प्रेक्षकांनी या सामन्याचा मनसोक्त आनंद घेतला.