शिवी दिली की दंडात्मक कारवाई; कुठे ?
schedule30 Nov 24 person by visibility 56 categoryTechnology
नेवासा: तालुक्यातील सौंदाळा गावाने समाजहिताच्या निर्णयात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ग्रामसभेत आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला आहे. लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी याबाबत माहिती दिली.
ग्रामसभा सदस्यांनी एकमताने ठरवले की, गावात यापुढे कोणालाही आई-बहिणीच्या नावाने शिव्या देण्याची परवानगी दिली जाणार नाही. जो कोण अशी शिवी देईल, त्याच्यावर पाचशे रुपयांचा दंड लागू करण्यात येईल. विशेषत: आई आणि बहिणीच्या शारीरिक अवयवांचा संदर्भ देणारी शिवीगाळ बंद करावी, असा ठराव संमत करण्यात आला आहे.
सरपंच शरद आरगडे म्हणाले, "अर्वाच्य शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो. त्यामुळे ग्रामपंचायतीने या निर्णयाद्वारे महिलांचा आणि भगिनींचा सन्मान राखण्याचा निर्धार केला आहे." त्यांनी सांगितले की, त्यांच्या पंधरावर्षीय कालावधीत अनेक समाजहिताचे ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आले आहेत. हा निर्णय एक आदर्श म्हणून राज्यभरातील इतर गावांसाठी एक उदाहरण ठरू शकतो.