पादचाऱ्यांना चिरडलं..... बेस्ट बस चालकावर गुन्हा दाखल
schedule10 Dec 24 person by visibility 61 categoryPolice Diary
मुंबई: मुंबईतील कुर्ला एलबीएस मार्गावर एका भयानक अपघातात बेस्ट बसने अनेक पादचाऱ्यांना चिरडले. भरधाव वेगाने शिरलेल्या या बसने बाजारात थेट धडक दिल्याने एकच खळबळ उडाली. या भीषण घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. बेस्ट बसच्या चालकाचा निष्काळजीपणा अपघाताचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.