हृदयद्रावक ! आगीत होरपळून १० नवजात बालकांचा मृत्यू
schedule16 Nov 24 person by visibility 106 categoryHealth
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील झाशी येथील महारानी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या एनआयसीयू (नवजात शिशु निगा विभाग) वॉर्डमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १६ बालकं गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरुवातीला ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानुसार, घटनेचं मूळ कारण अधिक धक्कादायक आहे. एका नर्सने ऑक्सिजन सिलिंडरच्या पाईपला जोडण्यासाठी काडीपेटीच्या काडीचा वापर केला. काडी पेटताच ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने मोठा स्फोट झाला आणि आग पसरली. त्यामुळे एनआयसीयू वॉर्डमध्ये ऑक्सिजनने भरलेल्या वातावरणात आगीचा भडका उडाला. या गंभीर घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले आहेत. १२ तासांच्या आत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.