महाराष्ट्रात बोगस औषधांचा भांडाफोड; धक्कादायक बाब समोर
schedule11 Dec 24 person by visibility 66 categoryHealth
मुंबई : महाराष्ट्रात बोगस गोळ्या आणि औषधांचा भांडाफोड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारात तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ही औषधे बनवणाऱ्या कंपन्याच अस्तित्वात नसल्याचे उघड झाले आहे.
या बनावट औषधांचा पुरवठा जानेवारी २०२४ पासून सरकारी संस्थांमधून सुरू असल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात या बोगस औषधांचा साठा आढळून आला आहे. दिव्य मराठीच्या रिपोर्टनुसार, धाराशीव जिल्ह्यातही बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आला होता. सुदैवाने, औषध विभागाने प्रतिबंधित साठा जप्त केल्याने त्याचे वितरण टळले.
या प्रकरणी सूरत आणि ठाणे येथे चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बनावट औषधांच्या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.या औषधांच्या उत्पादनासाठी ज्या कंपन्यांची नोंद आहे, त्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे उघडकीस आले आहे. या बोगस कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर औषधांचे उत्पादन करून त्याचा पुरवठा विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आला होता.
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशीव जिल्ह्यात बोगस औषधांचा पुरवठा झाल्याने, आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सरकारी संस्थांमधून बनावट औषधांचा पुरवठा होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठे आधारस्थान आहे. मात्र, या ठिकाणी बनावट औषधांचा साठा सापडल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.