मटण महाग का झालं? सुप्रिया सुळेंच्या मटणाच्या वक्तव्यावरून राऊतांचा पलटवार
schedule24 Aug 25 person by visibility 33 categoryPolitics

"मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुम्हाला अडचण काय आहे? आम्ही आमच्या पैशाने खातो, आम्ही कोणाचे मिंधे नाही", असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिंडोरी येथील खेडगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात केले होते. यावरून महायुतीच्या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुप्रिया सुळेंना महाराष्ट्रातील तमाम वारकरी उत्तर देतील, असे म्हटले. तर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो हे बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करुन शकत नाही तर किमान अपमान तरी करु नका. पण, मौलाना शरद पवारांच्या (Sharad Pawar) मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असा खोचक टोला सुप्रिया सुळेंना लगावला. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.
संजय राऊत म्हणाले की, ठीक आहे ना. त्यांच्यावर मटण खाण्याचा कोणी आक्षेप घेतला. या लोकांना टीका करण्याशिवाय काय येते? महाराष्ट्रात मटण खायला बंदी आहे का? महाराष्ट्राचा मराठा धर्म कोणी नष्ट केलेला आहे का? तसं असेल तर आम्हाला सांगा. कोणी काय खावं हे तुम्ही ठरवू शकत नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
फडणवीस शाकाहारी आहेत का?
सुप्रिया सुळे यांना वारकरी संप्रदाय उत्तर देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना सांगा की, तुम्ही चोरून काय खाता हे मला माहित आहे. फडणवीस काय शाकाहारी आहेत का? फडणवीस काय खाता हे आम्हाला माहित नाही का? कशाला खाण्यापिण्यावर जात आहात. स्वतः काय खात आहात. मार्केटला मटण चिकन का महाग झाले आहेत? आम्ही खात आहोत म्हणून नाहीत तर जे कालपर्यंत खात नव्हते तेच रांग लावून तिथे उभे राहत आहेत, असा पलटवार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.