बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या घरावर छापा, बायकोने 20 लाखांच्या नोटा जाळल्या, बाथरुमचा पाईप तुंबला
schedule24 Aug 25 person by visibility 39 categoryPolice Diary

बिहारच्या राजधानीत शनिवारी सकाळी थरारक कारवाई झाली. आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOU) पथकाने ग्रामीण बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता विनोद कुमार राय यांच्या घरी छापा टाकला आणि घरात जे उघड झालं ते अविश्वसनीय होतं! या दरम्यान, स्वयंपाकघरातील चिमणीतून लाखो रुपयांच्या नोटांचे गठ्ठे जप्त करण्यात आले आहेत.
ईओयू टीम रात्रीभर घराबाहेर थांबली. कारण विनोद राय यांच्या पत्नीने प्रवेश द्यायला नकार दिला होता. अखेर सकाळी 5:20 वाजता पथकाने जबरदस्तीने आत प्रवेश केला. घरात पाऊल टाकताच दिसलं – लाखो रुपयांचे गठ्ठे, दागिन्यांचा ढीग, महागडी घड्याळं आणि चिमणीत लपवलेलं काळं धन!
संपत्तीचा धक्कादायक आकडा
आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOU) पथकाने ग्रामीण बांधकाम विभागात काम करणारे अधीक्षक अभियंता विनोद कुमार राय यांच्या पाटणा येथील निवासस्थानी छापा टाकला, जिथे त्यांना सुमारे 40 लाख रुपये रोख, 20 लाख रुपयांच्या जळालेल्या नोटा, 10 लाख रुपयांचे दागिने आणि 6 लाख रुपयांचे घड्याळे सापडले. छाप्यात कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची कागदपत्रे आणि 12 हून अधिक बँक खातीही सापडली.
नोटा जाळण्याचा प्लॅन फसला!
विनोद कुमार राय यांच्या पत्नीने ईओयू टीमपासून वाचण्यासाठी लाखो रुपयांच्या नोटा जाळल्या, ज्यामुळे घरातील नालेही तुंबले होते. ईओयू अधिकाऱ्यांनी जळालेल्या नोटांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅब (एफएसएल) टीमला बोलावले आहे. याशिवाय, महानगरपालिकेची टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे आणि नाला साफ करून जळालेल्या नोटा काढण्यात मदत करत आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध ईओयूची मोठी कारवाई
ही कारवाई ईओयूच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग आहे. पण चिमणीत लपवलेली रोख रक्कम, नाल्यात अडकलेल्या नोटा आणि करोडोंची संपत्ती – हे सगळं सरकारी विभागांमध्ये पसरलेल्या भ्रष्टाचाराचं भयावह चित्र दाखवतं. सध्या विनोद कुमार राय यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.