जिल्ह्यात हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता मोहीम राबविणार - मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.
schedule07 Aug 25 person by visibility 37 categoryEntertainment Health

कोल्हापूर,: सांस्कृतिक मंत्रालयामार्फंत देशभरात हर घर तिरंगा मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम आता राष्ट्रीय अभिमान आणि लोकांच्या सहभागाचा उत्सव बनली आहे. यावर्षीच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता: स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग’ या टॅग लाईन अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय व सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यामाने दि. 8 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत मोहीम राबविणेत येणार आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर करुन या मोहिमेत नागरीकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.
स्वच्छ भारत अभियान (ग्रा) व जल जीवन अभियान अंतर्गत स्वच्छता, आरोग्य, जलसंवर्धन, स्रोत संरक्षण आणि जनजागृती वाढविण्यासाठी आठवडाभराची मोहीम (8 ते 15 ऑगस्ट) आयोजित करुन स्वातंत्र्य दिन साजरा करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ज्याचा शेवट प्रमुख पायाभूत सुविधांच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभात होईल.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) सन 2014 मध्ये सुरु झाले असून अभियानाचे उद्दिष्ट संपूर्ण देशात सार्वत्रिक स्वच्छता व्याप्ती साध्य करणे व स्वच्छतेला प्रोत्साहन देणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 15 ऑगस्ट 2019 रोजी जल जीवन अभियान: हर घर जल सुरु केले आहे. ज्यामुळे प्रत्येक घराला स्वच्छ नळाद्वारे पाणी पुवरठा करण्याचे उद्दिष्ट आहे. देशात दि. 15 ऑगस्ट रोजी (दोन्ही महत्वाकांक्षी अभियानाचा वर्धापन दिन) स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना, स्वच्छता मोहिमेद्वारे नागरी जबाबदारी, पर्यावरणीय व्यवस्थापन व राष्ट्रीय अभिमानाची मुल्य बळकट करण्याचा हा एक महत्वाचा क्षण आहे.
या मोहिमेत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) (SBM-G) व जल जीवन मिशन (JJM) अंतर्गत गावे, ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रम राबवावयाचे आहेत. यामध्ये या मोहिमेचा गावात शुभारंभ करणे, जनजागृती उपक्रम राबविणे, नागरीक व शालेय विद्यार्थ्यांव्दारे स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा घेणे, गावात लोकसहभागातुन सार्वजनिक ठिकाणे, पाणवठे, पाणी आणि स्वच्छतेची उपांगे ( सार्वजनिक शौचालये, घनकचरा व्यवस्थापन केंद्र, प्लास्टीक व्यवस्थापन केंद्र परिसर) यांची स्वच्छता करणे, प्लास्टीक कचरा संकलन मोहीम राबविणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे, पाण्याची गळती शोधणे व थांबवणे, जल जीवन मिशन अंतर्गत पायाभुत सुविधांची स्वच्छता व सुशोभीकरण करणे ( पाण्याच्या टाक्या, स्त्रोत, नळ जोडणी, पंप हाऊस इ. ), कचरा व्यवस्थापन तांत्रिक प्रात्यक्षिक करणे, जलसंवर्धन, भुजल पुनर्भरण, जलस्त्रोत संरक्षण, एकल वापराचे प्लास्टिक टाळणे इत्यादी बाबत जनजागृती करणे, स्वच्छतेचे आव्हान व उपाय योजना या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकांचे आयोजन करणे, पाणी व स्वच्छतेच्या पायाभूत सुविधांच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणे निश्चित करुन ध्वजारोहण करणे, हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत वैयक्तीक कुटुंब स्तरावर ध्वजारोहण करणे, स्वच्छता चॅम्पियन आणि स्वयंसेवकांचा ग्रामपंचायत स्तरावर सत्कार करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या मोहिमेसाठी #HarGharSwachhta व #HarGhar Tiranga हा हॅशटॅग आहे. या मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्थेच सदस्य, पाणी व स्वच्छता समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट सदस्य, शालेय विद्यार्थ्यी, स्वयंसेवक, नागरीक यांचा सहभाग घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) माधुरी परीट यांनी दिली आहे.