खोची येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराला वारणा नदीच्या पुराच्या पाण्याचा स्पर्श
schedule22 Aug 25 person by visibility 34 categoryकोल्हापूर

खोची: तालुका हातकणंगले येथील गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला मोठा पूर आला असून, यामुळे खोची येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराला पुराच्या पाण्याने स्पर्श केल्याची घटना नुकतीच घडली. या दृश्याने संपूर्ण गावात एक वेगळेच भक्तिभावाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
वारणा नदीचा पूर इतका वाढला की मंदिरापर्यंत पोहोचलेले पाणी काही वेळ मंदिराच्या प्रवेशद्वारावरून वाहत होते. या अप्रतिम आणि दुर्मीळ दृश्याने अनेक ग्रामस्थ भावूक झाले. मंदिराच्या पवित्र दरवाज्याला वारणा माईच्या जलाने झालेला नैसर्गिक स्पर्श हे देवीचा आशीर्वाद मानत गावकऱ्यांनी विशेष पूजन केले.
"हे दृष्य आमच्यासाठी पवित्र आहे. ग्रामदैवत आणि वारणा माई यांचा अद्भुत संगम आमच्या डोळ्यांसमोर झाला," असे शब्द एका ज्येष्ठ ग्रामस्थाने सांगितले.
ग्रामस्थांनी पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन मंदिर परिसरात योग्य ती खबरदारी घेतली आहे. सुदैवाने पाणी मंदिराच्या गर्भगृहापर्यंत पोहोचले नाही, मात्र दरवाज्यापर्यंत आलेल्या पाण्याचा भावनिक व धार्मिक दृष्टिकोनातून मोठा प्रभाव झाला आहे.गावात सध्या वातावरण स्थिर असून प्रशासन, ग्रामपंचायत सतर्क आहे. मात्र या अनोख्या घटनेमुळे भैरवनाथ मंदिराकडे अनेक भाविकांचे लक्ष वेधले गेले आहे.