महानेट अंतर्गत ग्रामीण भागात कामे करताना उकरलेले रस्ते पुर्ववत करा, अन्यथा संबंधितांवर कारवाई करा - पालकमंत्री, प्रकाश आबिटकर
schedule25 Jan 25 person by visibility 139 categoryकोल्हापूर

कोल्हापूर:
महानेट अंतर्गत सुरू असलेल्या कामांची तपासणी करून त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांमध्ये किती रस्ते पुर्ववत केले. तसेच संबंधित यंत्रणेची मंजुरी घेतली का याची चौकशी करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आढावा घेण्यासाठी संबंधित कंपनीचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते, केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या भारतनेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात महानेट प्रकल्प उभारण्यात येत असून त्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. आपणाला प्रकल्प हवाच आहे आणि याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. परंतु महानेट हे काम करीत असताना दळणवळणाचे दुसरे महत्त्वाचे साधन मोडकळीस आणत आहेत. प्रक्रियेचा अवलंब न करता चांगले रस्ते खोदून ते पुर्ववत न करता कामे करीत आहे. महानेटने केलेल्या खोदाईमुळे व त्यानंतर ते रस्ते पूर्ववत न केल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. काही वेळा यामुळे अपघातही होत असतात. त्यामुळे आत्तापर्यंत केलेल्या कामांमध्ये त्या त्या ठिकाणी रस्ते पूर्ववत केले किंवा नाही याची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यामध्ये सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद यांनी तयार केलेले रस्ते खोदण्याबाबत आवश्यक मंजुरी घेणे अपेक्षित आहे. शासनाच्या नियमावलीनुसार महानेटकडून कार्यवाही व्हावी ही अपेक्षा आहे. सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा मिळावी हा सर्वांचाच उद्देश आहे. परंतु हे काम करीत असताना चांगले रस्ते, चांगल्या सोयी सुविधांची पुन्हा तोडफोड करू नये, नियमावली पाहून महा नेटने काम करावे असे पालकमंत्री यांनी सांगितले. महा नेट कडून कामकाज करीत असताना कोणतेही यापूर्वी उभारलेले काम खराब होता कामा नये, चुकीच्या प्रक्रियेने काम करणाऱ्या यंत्रणेवर गुन्हे दाखल करावेत. महा नेटची कामे तर झालीच पाहिजेत पण ती प्रक्रियेनुसार करा. तालुक्यात काम सुरू करण्यापूर्वी त्या त्या यंत्रणेकडून मंजुरी घ्या. काम झाल्यानंतर उकरलेले रस्ते पुन्हा पूर्ववत केल्याचे प्रमाणपत्र घ्या. तसेच आज पासून कोणतेही काम पूर्वपरवानगीशिवाय सुरू करू नये. या कामाबाबत परवानगी घेत असताना संबंधित यंत्रणेने दिलेल्या सूचनेनुसार व सुचवलेल्या ठिकाणीच खोदकाम करून कामे पूर्ण करावीत असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
पूर्वी केलेल्या कामांची तपासणी करा
पूर्वी केलेल्या कामासाठी मंजुरी घेतली का? तसेच पुढील कामासाठी मंजुरी घेतल्याशिवाय कामे सुरू करू नये तसेच आतापर्यंत ज्या ठिकाणी रस्ते खोदाई करण्यात आली त्या ठिकाणी ते रस्ते पुन्हा पूर्ववत केले का? याबाबत तपासणी करून त्रयस्थ यंत्रणे कडून कामे पूर्ववत केल्याची खात्री करून त्याबाबतचा अहवाल घ्यावा अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या. महा नेट आणि स्थानिक प्रशासन यांच्या परस्पर समन्वयातून ही कामे करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व नियमावलीचा अभ्यास करून महा नेट तसेच स्थानिक यंत्रणा यांनी एक एसओपी तयार करून कमीत कमी खर्चाचे पर्याय शोधावेत. यापुढे होणाऱ्या प्रत्येक कामाची परवानगी रीतसर घेऊन महानेटने आपले कामकाज करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. यावेळी महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.