बदलीस पात्र (टप्पा क्रमांक 5) मधील शिक्षकांची यादी प्रसिध्द
schedule06 Aug 25 person by visibility 11 categoryEducation

कोल्हापूर दि.6 : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची ऑनलाईन पध्दतीने बदली प्रक्रीया सुरु झाली आहे. बदलीस पात्र (टप्पा क्रमांक ५) मधील पात्र शिक्षकांनी बदलीसाठी पर्याय निवडल्यानंतर निवडलेल्या पर्यायांची पडताळणी करून आपला अर्ज अंतिम करुन ऑनलाईन पोर्टलवर सबमिट झाल्याची खातरजमा करावी तसेच अंतिम केलेल्या अर्जाची स्थळप्रत (हार्डकॉपी) जतन करुन ठेवावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार बदलीस पात्र (टप्पा क्रमांक ५) मधील पात्र शिक्षकांना दिनांक 5 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम नोंद करण्यासाठीची सुविधा उपलब्ध असेल. या संवर्गातील पात्र शिक्षकांना आवश्यक असलेली सुधारित रिक्त पदांची यादी दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीनवरुन प्रसिध्द करण्यात आली असून ही यादी सर्व शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या लॉगीनवरून पाहता येईल.
दिनांक 5 ते 8 ऑगस्ट या कालावधीत आपल्या गटाकडील बदलीस पात्र मधील सर्व पात्र शिक्षकांना त्यांच्या लॉगीनवरुन बदली करीता शाळांचा प्राधान्यक्रम काळजीपूर्वक निवडण्याबाबत सूचित करावे. दिनांक 8 ऑगस्ट नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही तसेच हा प्राधान्यक्रम निवडणे ही संबंधित शिक्षकांची जबाबदारी असल्यामुळे या प्रक्रीयेमध्ये कोणत्याही प्रकारची चुक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षकांची असेल.
बदली अधिकार पात्र (टप्पा क्रमांक 4) मधील पात्र शिक्षकांना दिनांक 28 ते 31 जुलै 2025 अखेर बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम नोंद करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. या कालावधीत ज्या शिक्षकांची बदली अधिकार पात्र मधून बदली झाली आहे, अशा शिक्षकांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.