गणेश उत्सव कालावधीत लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध
schedule06 Aug 25 person by visibility 10 categoryEntertainment

कोल्हापूर, दि. 6: जिल्ह्यात दि. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या कालावधीत गणेश मुर्ती आगमन, घरगुती गणेश मुर्ती विसर्जन मिरवणुक तसेच इतर कार्यक्रमादरम्यान लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने डोळ्याचा पडदा तसेच बुबळाला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून आयोजित मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा शो किंवा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्यये दि.27 ऑगस्ट ते दि. 06 सप्टेंबर 2025 या कालावधीत लेझर लाईट वापरास प्रतिबंध केला आहे.
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. या मिरवणुकांमध्ये गणेश उत्सव मंडळांकडून लेझर, लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेश मुर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणूक बघण्याकरीता आलेल्या भाविकांच्या डोळ्यावर लेझर लाईट पडल्याने व्यक्तींचा डोळ्याचा पडदा तसेच बुबळाला इजा झाल्या होत्या. गणेश उत्सव कालावधीत विसर्जन मिरवणुक तसेच इतर कार्यक्रमा दरम्यान लेझर लाईट डोळ्यावर पडल्यास व्यक्तीच्या डोळ्याचा पडदा तसेच बुबुळाला इजा होवू शकते. यासाठी हा आदेश देण्यात आला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील, असेही या अधिसुचनेत नमुद करण्यात आले आहे.