मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
schedule22 Aug 25 person by visibility 23 categoryनोकरी


महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता
मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची काळजी घेता यावी, यासाठी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत “पाळणा” ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे कामगार व नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पाळणाघरांमध्ये डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच मुलांना दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता देण्यात येईल.
पाळणा घर महिन्यात 26 दिवस, दररोज 7.5 तास सुरु राहील, यामध्ये जास्तीत जास्त 25 मुले असतील. याठिकाणी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल. वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.
या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविका यांना ₹1500 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस यांना ₹750 प्रतिमाह, पाळणा सेविका मानधन यांना ₹5500 प्रतिमाह, तर पाळणा मदतनीस यांना ₹3000 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे.