एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती करा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचे निर्देश
schedule08 Aug 25 person by visibility 143 categoryEntertainment

मुंबई : मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत म्हणून एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संबंधित विभागांची संयुक्त समिती गठीत करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.
महाराष्ट्रातील एक पडदा चित्रपटगृहाबाबत उपाययोजना, अनुदान, मदत या मागणीसाठी विविध संस्था आणि चित्रपटगृह मालक, चालक संघटना, कलावंत, चित्रपट निर्माते यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांना निवेदन दिली होती. त्याबाबत सांस्कृतिक कार्य विभाग, गोरेगाव फिल्म सिटी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला चित्रपट गृह मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, नगरविकास, गृह, महसूल, वित्त आणि सांस्कृतिक कार्य विभाग व या क्षेत्रातील तज्ञ यांची संयुक्त समिती गठीत करुन याबाबत सविस्तर अभ्यास करण्यात यावा व त्याचा अहवाल दोन महिन्यात सादर करण्यात यावा. तसेच जी 300 चित्रपटगृहे सुरु आहेत आणि जी बंद आहेत, अशा सर्व एक पडदा चित्रपट गृहांमध्ये मराठी सिनेमा दाखवण्यात येणार असेल तर त्यासाठी काही प्रोत्साहन योजना याचाही विचार या समितीने करावा, असे निर्देश मंत्री श्री. शेलार यांनी दिले.
दरम्यान, गोरेगाव, मुंबई येथे प्रस्तावित असलेल्या नाट्यगृहाच्या विषयासंदर्भातही बैठक झाली. अभिनेते सुनील बर्वे आणि गोरेगावचे नागरिक या नाट्यगृहांसाठी आग्रही असून यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली होती. यासंदर्भात आमदार विद्या ठाकूर, महापालिका अधिकारी आणि संबधित कलावंत यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मंत्री श्री.शेलार यांनी आढावा घेतला. उपलब्ध जागा तसेच प्रस्तावित इमारतीबाबत कलावंताचे म्हणणे या सगळ्याचा विचार करुन येत्या पंधरा दिवसात अहवाल सादर करावा. लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री श्री.शेलार यांनी दिले.
लावणी कलावंताच्या प्रश्नांबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.