‘लंपी’च्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन
schedule13 Aug 25 person by visibility 105 categoryHealth

महाराष्ट्रातील एकूण गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत लंपीचा (चर्मरोग) प्रादूर्भाव अत्यल्प आहे. प्रादुर्भावग्रस्त भागात उपचार, कीटक नियंत्रण व जनजागृती मोहीम सुरू असून पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांचे लसीकरण करून घ्यावे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.
लंपीमुळे राज्यातील 9 हजार 820 पशुधन बाधित असून 6 हजार 618 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. तर आतापर्यंत 339 जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनामार्फत तात्काळ व प्रभावी नियंत्रण उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. राज्यात 93 टक्क्यांपेक्षा जास्त गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात गोट पॉक्सची विजातीय उत्तरकाशी स्ट्रेन लस दिली जात असून त्याचा परिणाम होऊन रोग प्रादूर्भाव कमी झाले आहेत. लंपी रोग प्रतीबंधक सजातीय लस वापरली गेली तर रोग नियंत्रणाकरीता अधिक परिणामकारक होईल. त्यामुळे या पुढील काळात लंपीवर नियंत्रण आणण्यासाठी लंपी प्रतिबंधात्मक लस निर्मितीचे तंत्रज्ञान भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या अॅग्रीइन्नोवेट इंडिया या कंपनीकडून उपलब्ध करून घेतले असून त्यामुळे पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे या पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय संस्थेमध्ये व्यावसायिक तत्त्वावर लसनिर्मिती लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात राज्य लंपी लस उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होवून राज्यातील 100 टक्के गोवर्गीय पशुधनास दरवर्षी प्रतिबंधात्मक लसीकरण करणे शक्य होणार आहे.
पशुसंवर्धन विभागाने लंपी प्रादुर्भावाचा साथरोग विषयक अभ्यास करुन रोग प्रतिबंधक लसीकरणाचा समावेश मान्सून पूर्व लसीकरण कार्यक्रमामध्ये केला आहे. या करिता 119 लक्ष लस मात्रा व अनुषंगिक साहित्याचा पुरवठा पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात आला आहे. लंपीबाबत पशुपालक तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली आहे.