शाळेचे गेट अंगावर पडल्याने सहावीतील विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
schedule22 Nov 24 person by visibility 94 categoryEducation
कुंभोज वार्ताहर(विनोद शिंगे)
केर्ले (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर शाळेतील सहावीत शिकणाऱ्या स्वरूप दीपक माने( वय १३) राहणार (केर्ले पैकी मानेवाडी) या विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचे लोखंडी गेट पडून त्याच्या डोक्याला मार लागल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. २१ रोजी सकाळी बारा वाजता घडली. या घटनेमुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे
याबाबतची अधिक माहिती अशी...
केर्ले येथील शेतकरी दीपकराज माने यांची स्वरूप व शौर्य अशी दोन मुले केर्ले येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर मध्ये शिकत आहेत स्वरूप हा सहावी मध्ये तर शौर्य हा चौथी मध्ये शिकत आहे नेहमीप्रमाणे दीपक राज हे सकाळी 11 वाजता त्यांच्या दोन मुलांना शाळेमध्ये पोहोचवून गेले. सकाळी शाळेची प्रार्थना झाल्यानंतर सर्व मुले वर्गामध्ये गेली. शाळा भरल्यानंतर स्वरूप मात्र शाळेच्या बाहेर गेट जवळ आला यावेळी शाळेचे भले मोठे अवजड नादुरुस्त असलेले गेट अचानक स्वरूपच्या अंगावर पडले आणि या गेट खाली स्वरूप सापडला यावेळी गेटच्या आवाजाने शेजारी असलेल्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला त्यांनी शिक्षकांना बाहेर बोलावले त्यावेळी गेट उचलून स्वरूप ला बाहेर काढण्यात आले भल्या मोठ्या गेटच्या वजनामुळे स्वरूपच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला होता बेशुद्ध अवस्थेतील स्वरूप ला शिक्षकांनी व नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात नेले.मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले.
आपल्या मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याचे समजल्यावर स्वरूप च्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला या घटनेमुळे केर्ले गावामध्ये चांगलीच खळबळ माजली. अवजड असलेल्या लोखंडी गेट सुरक्षित रित्या फिटिंग केले नव्हते लोखंडी गेट दोरी व कापडाने बांधण्यात आले होते त्यामुळे ते अनेक महिन्यांपासून असुरक्षित स्थितीत होते. संभाव्य धोक्याकडे शाळा प्रशासनाने दुर्लक्ष होते. त्यामुळेच कोवळ्या निष्पाप जीवाचा अंत झाल्याची चर्चा होती
दरम्यान ग्रामस्थांनीही शाळेच्या शिक्षक वृंद व प्रशासनाला घेराव घालून शाळेमध्ये बाथरूम असताना विद्यार्थी स्वरूप ला लघुशंकेला बाहेर का पाठवले? अनेक महिन्यांपासून शाळेच्या नादुरुस्त गेट कडे आणि संभाव्य धोक्याकडे शाळा प्रशासन शिक्षकांचे लक्ष नव्हते काय? शाळा व्यवस्थापन समिती नेमके काय काम करते? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करून शिक्षकांना धारेवर धरले.
घटनास्थळी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर करवीर चे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील केंद्रप्रमुख- सतीश अश्वरत्न यांनी भेट देऊन पाहणी केली.
केर्लीतील घटनेची पुनरावृत्ती काही वर्षांपूर्वी केर्ली गावातील एका शाळेमध्ये गेट अंगावर पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सर्वच शाळांच्या गेटची तपासणी आवश्यक आहे.