'मरावे परी देह अन अवयवरुपी उरावे’ -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर
schedule14 Aug 25 person by visibility 33 categoryHealth

कोल्हापूर: मरावे परी देह अन अवयवरुपी उरावे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी केले. आपल्या मृत्यूनंतर आपले शरीर हे एक तर जाळले जाते अथवा दफन केले जाते. परंतु अवयवदान करुन आपण ८ लोकांना जीवदान देवू शकतो. अवयवदानमध्ये मागणी आणि उपलब्धता यामधे प्रचंड तफावत असल्याने लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या संकल्पनेतून अवयवदानाची मोहीम राबविण्यात येत असून क्यु आर कोडद्वारे जास्तीत जास्त नागरिकांनी आपला नोंदणी फॉर्म भरावा, असे आवाहन डॉ. वाडीकर यांनी केले आहे.
अवयवदान जनजागृतीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अंगदान-जीवन संजीवनी अभियान अंतर्गत ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान जनजागृती पंधरवडा राबवण्यात येत आहे. दि. १३ ऑगस्ट रोजी अवयवदाना निमित्त सीपीआर हॉस्पिटल येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अवयवदानामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून नेत्रदानामध्ये तिसऱ्या स्थानावर आहे तसेच प्रतिज्ञा फॉर्म भरण्यात राज्यात अव्वल स्थानी आहे. यावेळी यशोधन फौडेशनचे योगेश अग्रवाल यांनी अवयवदान संबंधी सविस्तर माहिती दिली.
सीपीआर हॉस्पिटलचे जिल्हा सल्लागार डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा दिली तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य एस. पी. घाटगे यांनी स्वागत व आभार मानले. यावेळी उपप्राचार्य, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री जॉन लोखंडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.