समाज कल्याण अधिनस्त शासकीय वसतिगृहात विनामूल्य प्रवेश सुरु
schedule22 Aug 25 person by visibility 11 categoryEducation

कोल्हापूर, दि. 22 : सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यात मुला-मुलींची 18 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये अनुसुचित जाती, जमाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील शालेय व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असून http://hmas.mahalt.org पोर्टलवर अर्ज स्विकारण्यात येतील. गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे अर्ज सादर करावेत. व्यावसायिक अभ्यासक्रमातील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी दि. 15 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळेच्या भोजनाची व अंथरुण-पांघरुणासह राहण्याची मोफत सोय, मासिक दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, प्रोजेक्ट रिपोर्ट भत्ता, महाविद्यालयाकरीता ड्रेसकोड, वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकरीता अॅपरन, स्टेटोस्कोप, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी बॉयलर सुट, ड्रॉईंग बोर्ड, लॅब ॲपरन, छत्री, रेनकोड, गमबूट, सहल भत्ता इत्यादी प्रकारच्या सोयी सुविधा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यासाठी डीबीटीव्दारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त इमारत, मनोरंजन कक्ष, अद्ययावत जिम, वायफाय सुविधा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, मुलींना सुरक्षित वातावरण, आंघोळीसाठी गरम पाण्याचे सोलर सिस्टीम, सुरक्षा रक्षक व सफाईगार इत्यादी प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष किंवा दूरध्वनी क्र. 02312-2651318 वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.