मुंबई : महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शैक्षणिक गुणवत्तेसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत कडक पावले उचलली आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळी ९ नंतरच सुरू कराव्यात, असा आदेश शिक्षण विभागाने जारी केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना पुरेशी झोप मिळाली नाही, तर त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो, असा अभिप्राय शिक्षण तज्ज्ञ, पालक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. यामुळे शासनाने मागील वर्षी शाळा सकाळी ७ ऐवजी ९ नंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
शासनाच्या आदेशानंतरही अनेक शाळा सकाळी ७ वाजल्यापासून सुरू केल्या जात आहेत. काही शाळा दोन शिफ्टमध्ये चालवल्या जात असल्यामुळे विद्यार्थी सकाळी लवकर शाळेत उपस्थित राहण्यास भाग पडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
शासनाने स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, सर्व शाळांनी सकाळी ९ नंतरच अध्यापन कार्य सुरू करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल. सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि सकाळी ९ नंतरच शाळा सुरू कराव्यात, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. आदेशाचे पालन न केल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा पुनरुच्चार विभागाने केला आहे.