मुंबईवरुन कोकण-गोव्यात जाणाऱ्यांसाठी 26 जानेवारीपासून मिळणार ही नवीन सुविधा
schedule02 Jan 25 person by visibility 257 categoryTravel

गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाबाबत चर्चा होत आहे. या महामार्गाचे काम रखडले आहे. गेली अठरा वर्षे झाली या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. या महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे गोवा अन् कोकणला जाणाऱ्यावाहनधारकांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या महामार्गासाठी डिसेंबर 2024 ची दिलेली डेडलाईन आता हुकली आहे. परंतु त्यातील एक चांगली बातमी आली आहे. या महामार्गावरील कशेडीतील दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.
कशेडी येथील पहिल्या बोगद्यातून दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दुसऱ्या बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला होता. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाल्यावर दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील.
मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वांत अवघड आणि धोकेदायक कशेडी घाट आहे. या घाटात सुमारे दोन किलोमीटरचे येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे केले आहे. कशेडी बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वाहनधारकांना चांगला दिलासा मिळणार आहे. या महामार्गावर बोगद्याच्या परिसरात 45 मिनिटांचा असणारा प्रवास 8 मिनिटांत होणार आहे. यामुळे कोकणवासियांचा रस्ते प्रवास हा अधिक सुखकर होणार आहे.