गोळी भिंतीला लागली आणि माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले
schedule04 Dec 24 person by visibility 103 categoryPolice Diary
अमृतसर: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर काल (३ डिसेंबर) अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर गोळीबार झाला. या हल्ल्यात सुखबीर सिंह बादल थोडक्यात बचावले असून घटनास्थळी खळबळ उडाली. हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून चौकशी सुरू आहे.
अकाल तख्तने सुखबीर सिंह बादल यांना दोषी ठरवून धार्मिक शिक्षा सुनावली होती. त्यानुसार, बुधवारी पहाटे ते सुवर्ण मंदिराच्या बाहेर द्वारपाल म्हणून सेवा बजावत होते. या शिक्षेच्या दरम्यानच गोळीबाराची घटना घडली. अकाल तख्तच्या शिक्षेनुसार, त्यांना स्वच्छतागृह स्वच्छ करणे आणि स्वयंपाकघरातील भांडी स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले होते.
गोळीबारानंतर सुवर्ण मंदिर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून हल्ल्याचा उद्देश आणि त्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
या घटनेनंतर पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. सुखबीर सिंह बादल हे अकाली दलाचे महत्त्वाचे नेते असून त्यांच्या सुरक्षेतील त्रुटीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या हल्ल्याने धार्मिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
घटनास्थळी जमलेल्या जमावाला शांत करण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. सुवर्ण मंदिर परिसरातील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.पंजाबमधील ही घटना धार्मिक आणि राजकीय स्थिरतेसाठी आव्हान ठरणारी असून या घटनेचे पडसाद लवकरच उमटण्याची शक्यता आहे.