एमबीबीएस द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार
schedule04 Dec 24 person by visibility 50 categoryEducation
मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या फार्मकोलॉजी - 1 या विषयाच्या परीक्षेत पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 2 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर तासभर आधी लीक झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकारामुळे 2 डिसेंबरची परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली असून फेरपरीक्षेची तारीख 19 डिसेंबर 2024 निश्चित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील 50 केंद्रांवर सुमारे 7,900 विद्यार्थी बसणार होते.
या गंभीर घटनेचे मूळ शोधण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने उच्चस्तरीय तपास समिती स्थापन केली आहे. याशिवाय, सायबर सेलच्या मदतीने लीक झालेल्या ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. कुलगुरूंच्याआदेशानुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व परीक्षेच्या तयारीवर परिणाम झाला आहे. अशा घटना विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम करतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.