ह्रदयद्रावक! ऊसाच्या ट्रॉलीखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू
schedule06 Dec 24 person by visibility 88 categoryTravel
कवठेगुलंद (माळ भाग, ता. शिरोळ) येथे ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संजय राघोबा गडगे (वय ५०, रा. बुबनाळ, ता. शिरोळ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणाची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी ट्रॅक्टरचालक संतोष आण्णाप्पा बेळवी (रा. यल्लूर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) याला ताब्यात घेतले आहे.
संजय गडगे सकाळी दूध घेऊन माळभाग येथून आपल्या घराकडे निघाले होते. दरम्यान, एका हॉटेलजवळ मुख्य रस्त्यावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्रमांक: के.ए. २३ टी.बी. ५८१०) थांबला होता. रिकाम्या दोन ट्रॉल्या जोडलेल्या ट्रॅक्टरने हालचाल करत असताना मागच्या ट्रॉलीचा धक्का संजय गडगे यांना बसला. त्यामुळे ते खाली कोसळले आणि त्याच वेळी ट्रॉलीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले.
त्यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संजय गडगे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे.या अपघाताची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ट्रॅक्टरचालकाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.संजय गडगे यांच्या आकस्मिक निधनामुळे बुबनाळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.