अजित पवार गटाच्या आमदाराचा निर्णय ; संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळणार आर्थिक मदत
schedule02 Jan 25 person by visibility 38 categoryPolitics
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारं आहे. अत्यंत निर्घुण पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली असून या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. सध्या वाल्मिक कराड हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला बीडच्या केज कोर्टाने कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून अजून धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजून फरार आहेत.
राज्यभरात त्यांच्या अटकेसाठी मोर्चे निघत आहेत. राज्यातील विरोधी पक्षांनी आणि बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय लावून धरला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर प्रचंड दबाव आहे. संतोष देखमुख हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारने सीआयडीकडे दिला आहे.
“वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास होईपर्यंत मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावे. ही मागणी मी सुरुवातीपासून करत आहे” असं प्रकाश साळंके म्हणाले. “स्वतः मुख्यमंत्री याप्रकरणात लक्ष घालून असल्याने अजित पवार यांनी लक्ष घालावे असे वाटत नाही” असं त्यांनी सांगितलं. “आरोपींना तात्काळ अटक करून कुटुंबाला न्याय मिळावा हीच मागणी आहे. विजय वडे्टीवार काय बोलले ते मला माहित नाही. मी त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही” असं प्रकाश सोळंके म्हणाले. “संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला उद्या मी 35 ते 40 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे” असं प्रकाश सोळंके यांनी सांगितलं.