भुजबळ, पवारांचा एकाच गाडीतून प्रवास
schedule04 Jan 25 person by visibility 37 categoryPolitics
पुण्याच्या चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले. त्यानंतर शरद पवार आणि छगन भुजबळ
यांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला. छगन भुजबळ हे शरद पवारांच्या पाया देखील पडले. त्यानंतर माजी आमदार राम कांडगे यांच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा देखील झाली. भुजबळ आणि शरद पवार यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
छगन भुजबळ दौऱ्यावरून परत आल्यानंतर ही भेट झाली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर छगन भुजबळ दुसऱ्यांदा पवारांना भेटले, या आधी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर आता माजी आमदार राम कांडगे यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली.
दुसरीकडे आज छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट झाली आहे. शरद पवारांना भेटण्यापूर्वी भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. साताऱ्याच्या नायगावमध्ये फडणवीस आणि भुजबळ यांनी एकत्र प्रवास केला. देवेंद्र फडणवीस हे ड्रायव्हरच्या बाजुला बसले होते तर भुजबळ मागच्या सीटवर बसले होते. भुजबळांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे, त्यातच आता छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रवास देखील केला त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.